top of page
Writer's pictureNiharika Kolte Alekar

उद्योजकतेची पहिली पिढी - Maxima

Updated: Sep 28

व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना नवा उद्योग सुरू करणं हे तसं कठीण कर्म. त्यात उद्योजक महिला असेल, तर तिच्या यशस्वीतेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातात. अलीकडे हा भेद तसा कमी झालाय हे खरं आहे, पण समूळ नष्ट झालेला नाही हेही सत्यच. अशीच एक महिला विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आपल्या उद्योजकतेची सुरवात करते आणि कुटुंबातील पहिली उद्योजक ठरते. निहारिका कोलते आळेकर हे त्यांचं नाव. त्या त्यांच्या वोलार अल्टा कंपनीच्या माध्यमातून ड्रोनच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. इंडस्ट्रीयल व्हिज्युअल इंस्पेक्शन करण्यासाठी त्यांची कंपनी आज अनेक उद्योगांना साहाय्य करत आहे.

Women in Drone Industry

निहारिका या मुळच्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्याच्या. त्यामुळे वैचारिक बैठक पुढारलेली असणे तसे अपेक्षित. पण पुणेकर म्हणून व्यवसाय देखील यशस्वी होईलच असा काही नियम नाही. त्यामुळे सर्वसामान्य उद्योजकाला सामोरं जाव लागणाऱ्या अडचणींशी दोन हात त्यांनाही करावे लागले असणार. लहान असताना शिक्षणासह शिक्षणेतर गोष्टींमध्ये त्या हिरीरीने सहभाग नोंदवत असत. त्यामुळे ‘बे एके बे’सह खेळांतुन मिळणाऱ्या आनंदाला त्यांना मुकावे लागले नाही. फक्त खेळच नाही, तर परकीय भाषा शिकणे, विविध कला स्पर्धांत सहभाग नोंदवणे यासरख्या गोष्टींत देखील त्यांचा पुढाकार असे. ‘हे सर्व करत असताना, माझ्या पालकांची मोलाची साथ मला लाभली. त्यांनी केव्हाही मला अशा गोष्टी करण्यापासुन परावृत्त केले नाही’, असं निहारिका अभिमानाने सांगतात. पुण्यातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. आणि त्यांनी नोकरी निमित्ताने मुंबईत पाऊल टाकले. आपले शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर त्या PwC मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून रुजू झाल्या. पुढे KPMG सारख्या कंपनीत देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. कॉर्पोरेट क्षेत्रात जवळपास पाचहून अधिक वर्षे त्यांनी घालवल्यावर ‘कुछ अलग करना है’ची जाणीव त्यांना होऊ लागली. डोळ्यांसमोर रिचर्ड ब्रॅन्सन, स्टीव्ह जॉब्स यांचे आदर्श होतेच.


M&A Infra मध्ये कार्यरत असताना त्यांना आपल्या उद्योजकतेचा मार्ग गवसला. कंपन्यांमध्ये तांत्रिक सर्वेक्षण हे सर्वसामान्य कर्मचार्‍यांकडून आणि सॅम्पल पद्धतीने केले जाते. एखाद्या टनेलमध्ये जाऊन रिस्क इन्स्पेक्शन करताना अंदाज चुकू शकतात. त्यामुळे चुका होण्याचा तसेच दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर अश्या ठिकाणी ड्रोन वापरले तर?

Drone Inspection Company India
बॉम्बे इंडस्ट्री असोसिएशन मध्ये लेक्चर देताना निहारिका

निहारिका यांनी हीच संधी साधण्याचे ठरवले आणि जन्म झाला, ‘वोलर अल्टा’चा. या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली. ‘अधिकाधिक मेहनत’ हे ब्रीद उराशी बाळगून त्यांनी वोलर अल्टाचा नावलौकिक वाढवला. २०२०च्या नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात आशियातील सर्वात प्रभावशाली महिला (Asia’s most influential women in the renewable energy space 2020) होण्याचा मान निहारिका यांनी मिळवला. चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्पिकर म्हणून त्यांनाही आमंत्रित करण्यात आले. उद्योजकता, नवकल्पना आणि नेतृत्व क्षेत्रातील परिषदांत त्यांना आजही मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्यात येते.




◆ … तर आयुष्य सोपं होईल ‘होय, लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. अल्लडपणा बाजूला सारत मल्टि टास्किंग व्हावं लागतं. पण यात विशेष काही नाही. कारण प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग आहे. असं मी म्हणेन. त्यामुळे मी म्हणेन मुली हे सत्य जितक्या लवकर स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तितकं आयुष्य सोपं होईल.’ आयुष्याच्या वाटेवर लग्नाबाबद्दल विचारणा केल्यावर निहारिका वरील वक्तव्य करतात. पुढे सांगताना त्या म्हणतात, ‘मल्टि टास्किंग हे महत्त्वाचं आहे. आज जर हे कौशल्य आत्मसात करू शकला नाहीत तर जेव्हा कुटुंब मोठं होईल तेव्हा काय कराल?’ तरुण मुलींनी यातून धडा घ्यायला हवा.


Drone Industry in India , Drone Entrepreneur India
भारत ड्रोन महोत्सवात बोलताना 2022

◆ समस्येला समाधान असतंच उद्योजक म्हणून कुटुंबातील सदस्यांचे मत विचारल्यावर निहारिका सांगतात, ‘माझे पती, माझे दोन्ही कुटुंब आणि गुरू यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथवरचा प्रवास करू शकले. या संपूर्ण प्रवासातील त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही समस्येला समाधान हे असतंच हे त्यांनीच तर शिकवलं. माझ्या आईवडिलांनी मला मुलगी म्हणून केव्हाही मर्यादांचा जाळ्यात अडकलं नाही. त्यासोबत एक नागरिक म्हणून माझ्या जबाबदऱ्यांची जाणीव देखील मला वेळोवेळी करून दिली. त्यामुळे आज मागे वळून पाहताना मला त्यांच्या या शिकवणीची आठवण होत राहते.’ याच कारणामुळे कुटुंबात कुठलेली व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना निहारिका यशस्वी होऊ शकल्या. यामुळेच आज त्या कुटुंबातील उद्योजकतेची पहिली पिढी म्हणून पुढे येत आहेत.

Volar Alta Niharika Kolte Alekar
निहारिका कोलते आळेकर

◆ आता सीमोल्लंघन करायचं आहे…

वोलार अल्टाचे कार्यक्षेत्र आता वाढवण्यावर निहारिका यांचा भर आहे. तपासणी करताना वापरण्यात येणारे सध्याचे ड्रोन हे त्यांना खरेदी करावे लागतात. त्यामुळे उपलब्ध ड्रोनमधून योग्य ड्रोनची निवड त्यांना करावी लागते. भविष्यात स्वतःच ड्रोन निर्माता होण्याचं उद्धिष्ट वोलार अल्टाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासोबत लॉजिस्टिक क्षेत्रात ड्रोन उपलब्ध करून देण्याचा त्यांचा कयास आहे. करोना काळात असाच एक समाजोपयोगी मेडिसिन डिलिव्हरीचा उपक्रम ड्रोनच्या साहाय्याने त्यांनी राबविला होता. प्रसारमाध्यमांनी त्यावेळी याची दखल देखील घेतली होती.





◆ कष्टाला पर्याय नाही! अखेरीस तरुणांना द्यावयाच्या संदेशात निहारिका म्हणतात, ‘कष्टाला पर्याय नसतो. यशस्वी व्हायचं असेल तर शॉर्टकट्स वापरू नका. शिवाय अनेकदा आपण मदत मागायला कचरतो. पण खरंतर मदत मागण्यात गैर काहीच नाही. एकदा मदत मागून तर पहा तुम्हाला लक्षात येईल किती मंडळी तुम्हाला मदतीचा हात पुढे करतात. आणि शेवटचं, महिला उद्योग असं काही नसतं. फक्त उद्योजक हेच सत्य आहे. उद्योजकतेत लिंगभेद कधीच केला जात नाही.’


Drone Inspection Service Company India


12 views0 comments

Comentários


bottom of page